एक नदी वाहत असते आपल्यात निरंतर…


एक नदी वाहत असते आपल्यात निरंतर…

नदी हा सृष्टीतला आदिम आणि निरंतर वाहणारा घटक. वाहते ती नदी. नाद करते ती नदी. नदीला ‘सदानीरा’ ही उपमा अतिशय समपर्क आहे. कारण थांबलेली, तुंबलेली किंवा कोरडीठण्ण झालेल्या नदीची कल्पनाही करवत नाही. वाहत राहणे हा नदीचा धर्म आहे. नदी वाहते म्हणजे ती जीवंत आहे. तिच्या उदरात हजारो जलचर केवळ तिच्या वाहण्यामुळे जीवंत राहू शकतात. ती वाहते तोवर तिच्या काठी माणसं- जीव-जनावरं राहू शकतात. नदी आपल्याला पोसते. मानवी संस्कृती नदीनेच तर समृद्ध केली आहे. नद्यांना पृथ्वीच्या रक्तवाहिन्या म्हटलं तरी वावगं ठऊ नये. नदी आपल्यामध्ये भलं-बुरं सारं काही सामावून घेते. ती निर्मळा, जलदायिनी, जीवनदायिनी आहे. नदी देत राहते निरपेक्ष. भारतात नदीला आईचं स्थान आहे. गंगामैया, गिरणामाई, तापीमाय अशा नावानं नद्यांना संबोधल जातं. पुरानातही नद्यांची महती गायिली आहे. ती अगाध अनंत अमर्याद आहे म्हणून तर आपल्याकडे ‘‘साधूचे कूळ आणि नदीचे मूळ पुसू नये’’अशी म्हण प्रचलित आहे.
प्रत्येक नदीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येकीला स्वतःची ओळख असते. नाव असतं. प्रत्येक नदीत काही प्रमाणात मासे आणि इतर जलचरही वेगळे असतात. नदीने लोकसंस्कृती उभी केलेली असते. तिची मिथकं, लोककथा, लोकगीत या लोकसंस्कृतीतून शेकडो वर्षे जतन केली जात असतात. आपल्या प्रत्येकामध्ये एक नदी वाहत असते निरंतर…. ज्या गावात नदी नाही तिथली माणसं आजोळी, नातलगांच्या गावी असलेल्या नदीशी आपलं नातं सांगतात. नद्यांच्या नावाने गावं ओळखली जातात.
माझी नदीमाय आहे वाघूर, मी वाघूरेचं पाणी प्यालोच. ती संचारतेय माझ्यात. ‘वाघूर’ या तीन अक्षरांच्या शब्दात मोठी जादू आहे. या शब्दात रूबाब आहे. आपलेपणा आहे. ‘वाघूर’ हे नाव पूर्वजांनी एका नदीसाठी योजावे ही एक विलक्षण बाब आहे. अजिंठ्याच्या डोंगरातून उगम पावणार्या या उदकधारा पुढे वाघासारख्या घूरघूरत ऐटीत वाहतात. वाघाचा ऊर असणार्या या नदीला याहून दुसरं नाव शोभलंही नसतं. जगाच्या किंबहुना भारताच्या प्राकृतिक नकाशावरही न दिसणारी इवलीशी ही नदी. उगमापासून उणेपुरे नव्वद मैल अंतरावर ती तापीमायच्या कुशीत शिरते. हाकेच्या अंतरावर सासर मिळालेल्या लेकीचा इतर माहेरवाशिनींनी हेवा करावा अशीच ही तापीची लाडकी लेक. जी अंजिठ्यांच्या कुशीतल्या कितीतरी लोककथा तिच्या काठच्या लोकांना सांगत वाहत असते. सहा महिन्यांची रात्र पडली तेव्हा याच वाघूरेच्या मंजुळ पार्श्वसंगीतात अजिंठा कोरला गेलाय. रॉबर्ट गिल आणि पारोच्या पवित्र प्रेमाची साक्षीदार आहे वाघूर. नदी ही भुईची लेक. डोंगर तिचा बाप. तिच्या काठावर राहणारी आपण नदीची लेकरं. डोंगर हे माहेर तर समुद्र तिचं सासर आहे. अजिंठ्याच्या डोंगरातून जन्मलेली ही माहेरवाशीन पुढे तापीमायच्या कुशीतून गुजरातमधल्या भरूच येथे अरबी समुद्राला मिळते.
वाघूर नदीच्या काठावरच शेवटचं गाव माझं कडगाव, वाघूर- तापीच्या संगमावरचं. आजही वाघूरच्या खोर्यांमधून वाघांचे धाव आढळून येतात. ‘वाघनये’ नावाने ओळखल्या जाणार्या गुहाही कडगावलगत वाघूरकाठी आहे. जिथं दिवसाही जायची हिंमत होत नाही. वाघांचा असा रहिवास वाघूरच्या काठी अनेक ठिकाणी होता. वाघांना पोसणारी, वाघांसारखी शूर म्हणून तर ती वाघूर!
मला चालता येत नव्हतं तेव्हापासून माझी पावलं वाघूरच्या पाण्याने रोज भिजायची. सारं गाव नदीवर असायचं. सूर्य उगवण्याआधीपासून दिवस मावळेपर्यंत नदीवर माणसांची गर्दी असायची. रात्रीही मासे-खेकडे पकडणारी मंडळी नदी काठी बत्तीसोबत भटकताना दिसे. बारमाही वाहणारी नदी. तिच्या भोवतालचा परिसर त्यामुळे सदाहरित असे. मुबलक चारा आणि पाणी यामुळे आमच्या गावी गुरं ढोरं फार होती. प्रत्येकाच्या घरी जनावर होती. माझे वडील गुराखी. ते दिवसभर वाघूरकाठी गावातली गुरं चारायचे. माझंही शाळेत फारसं लक्ष लागायचं नाही. आठवड्यातील चार दिवस मी बाबांसोबत नदीकाठी गुरं वळायचो. मनसोक्त नदीपात्रात खेळायचो. मला खेकडे व मासे धरण्याची कला बालपणीच अवगत झाली होती. साकेगाव-जोगलखेडा-शेळगाव पर्यंतच्या वीस पंचवीस मैलाचा वाघूरकाठ मी रोज पालथा घालायचो. डोंगरी, पाभे, वाघनये, भाटी, सोंडे, झिरपट, नागझिरी, पाचोटी, मयी, काकूकराड, सवानी, बाम्हणडोह, चांभारखिडकी, सातपार्या, नावाचा दगड, ताटी, आसराचा झीर ही वाघूर नदीच्या गावकर्यांनी आखलेल्या काही खूणाखूणा.
कासव, शिंपले, शंकू, बेडूक, धामण, खेकडा, झिंगा, पानविंचू, पानकाथनी, कवडी, गांडोक ही माशांसोबत आमच्या वाघूरमध्ये आढळणारे जीव. लालपरी, कथला, गिरगल, डोक, बह्यांडा, कोंबडा, खार्च्या, कालवट, डोडर, मंगळूर, भाडक, वाव, गेर, तारू, उमरी, बोरई, मह्या मुर्ही, झीरमोरी, पिंजारी, डेबरी, मोयदा, वरडोई, झोर या खास वाघूर नदीतल्या मासोळ्या. रोज संध्याकाळी मी घरी परतताना न्याहारीच्या फडक्यात मासे घेऊन जायचो. गावात आलेला पाहुणा वाघूरची मच्छी न खाता कधीच गेला नाही. आमच्या चुलीवर तर मासे-खेकडे शिजले किंवा भाजले नाहीत असं कधी घडलं नाही. रात्री झोपतानाही निरव शांततेत वाघूरचा खळाळ स्पष्ट ऐकू यायचा. हे संगीत ऐकत कधी झोप यायची कळायचं नाही पुर किती आला आहे ! उद्या पारच्या वावरात जाता येईल की नाही हे रात्री झोपेत ऐकलेल्या आदीच्या आवाजावरून सहज लक्षात येई. नदीची गोष्ट ही केवळ तिच्या एकटीची नसते. तिच्यातल्या असंख्य जीवांची असते. तिच्या काठच्या दगड-मारी-वाळू, झाडं-झुडपं, जनावरांची आणि तिच्याकाठी राहणार्या मानवी संस्कृतीची, गावागावातल्या माणसांची आणि त्यांच्या मनातल्या नदीची गोष्ट असते. ही नदीकाठची माणसं दिवसभर नदीवर असतात. रात्री झोपल्यावरही स्वप्नात नदी तळाशी शांत बुडलेले असतात. बुजुर्ग माणसं नेणात्या लेकरांना नदीच्या गोष्टी सांगत असतात. नदीपात्रातल्या साहसकथा लोक एकमेकांना ऐकवत असतात. नद्या या अशा आपल्याला समृद्ध करीत असतात.
वाघूरने माझं बालपण समृद्ध केलं. तिचे आजन्म ऋण आहे माझ्यावर. तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी दिवाळी अंकाला ‘वाघूर’ हेच नाव दिलं. आज इतर नद्यांप्रमाणे वाघूरची बिकट अवस्था झाली आहे. ऐन पावसाळ्यातही ती वाहत नाही. तिची ही मरणासन्न अवस्था पाहून मन भरून येतं. तिने माझ्यावर लळा लावला… ‘वाघूरकाठचे दिवस’ माझ्या आजन्म स्मरणात राहतील. अशा कितीतरी कडू गोड आठवणी आहेत वाघूरसोबतच्या. हिच्या पुरात जशी भली मोठी लाकडं, आेंडके, बैलगाड्या, वाहताना पाहिलेली तशीच गावातली गुरं-ढोरं-माणसंही वाहताना पाहिली. याच वाघूरच्या प्रवाहात आम्ही दिवटीचे विसर्जन करायचो. अमावस्येच्या काळोख्यारात्री गावातल्या सर्व गुराख्यांच्या दिवट्या वाहताना खुललेलं वाघूरचं लख्ख रूप आजही डोळ्यांसमोर तरळतं.
नदी आटली आणि गावही हळूहळू ओसाड झालं. आपणच या जीवनदायिनीचा घात केला आहे हे आपल्या लक्षात येवो. माझ्या रक्तात वाघूरचा अंश आहे. हा श्वास सुरू आहे. तोवर ती माझ्या रोमारोमात असेल आणि माझ्यानंतरही माझी देहाची राख वाघूरमध्ये विसर्जित होईल तिच या जन्माची फलश्रुति.

■■


Comments