■ धार आणि काठ


धार आणि काठ 

धार आणि काठ नदीचे अविभाज्य घटक. काठ हा देह मानला तर धार नदीचा आत्मा आहे. नदी वाहाते तेंव्हा काठ जिवंत असतो. धार दोन्ही काठांची तहान भागवते. काठांवरची जीवसृष्टी समृद्ध करते. धारेचं मंजुळ संगीत मंत्रमुग्ध करतं काठाला. काठ धारेला वाहू देतात  आपल्या उदरातून. डोहाचा तळ हा काठाचा पायथाच असतो. काठ जितका उंच तितकी धार खोल जाते तळ गाठत. धार हीच काठांची धमनी. काठ खोदत जाल तर सापडतो धारेचा अंश. धारेला उपसलं तर काठ सापडतोच अंतरंगात. काठ अथांग आहे. धार अमर्याद आहे.

वाघूरची धार आणि काठ  'सवानी' धार आणि काठ या दोन्हींचा आनंद आकंठ दिला. सावनी हा माथ्यावरचा नदीकाठ. माझं मन इथे जास्त रमायचं. गुरांसाठीची चराई इथून जवळ होती शिवाय आमच्या वाडवडिलांची वावरंही चऱ्हाटभर अंतरावर होती. नदीत मनसोक्त पोहचण्याचा, मासे खेकडे पकडण्याचा आनंद केवळ सवानीत मिळायचा. पूर्वेकडच्या काठावरचं वावर एका शेतकऱ्याने सव्वा रुपयाला विकत घेतलं होतं म्हणून या वावराला आणि त्यापुढच्या नदीभागाला सवानी हे नाव पडलं. नदीला पूर आलाय हे सावनीतल्या खळखडाटावरून सहज   कळे. हा थोडा पसरट, उथड आणि खडकाळ भाग होता. एकट्यानं खेकडे-मासे पकडणं इथे शक्य असायचं. नदी तीन धारांमध्ये विभागली होती सवानीत. उतारावरून पाणी प्रचंड वेगानं खडकांवर आदळायचं. या पाण्याचा आवाज इतका मोठा असायचा की जवळच्या माणसाचं बोलणं ऐकू येईना. शिवाय नावेच्या आकाराचे महाकाय पाषाणही होती इथं, पोहून मासे पकडून थकवा आला की याच दगडांवर मी पडून रहायचो. तन-मनातून वाघूर वाहायची. नदी बोलते असं ऐकून नवल वाटेल पण सावनीतल्या भागात वाघूर बोलायची. तिच्या आवाजात स्वतःचा लहेजा होता. रांगडेपणा होता. चैत्र-वैशाखात वाघूरचा जोर-शोर मंदावलेला असायचा. काठापासून धारेचं अंतर ओसरलेलं असायचं या काळात. रानात उलंगतीचे दिवस असल्याने गुरं मोकाट सोडली जायची. मजूर माणसं बायांच्या हातची कामं जवळपास संपलेली असायची. घरातल्या डाळी-साळी खाऊन मातकट झालेल्या तोंडाची चव पालटण्यासाठी ही माणसं वाघूरभर मासेमारी करायची. मासोळ्या धरायच्या कितीतरी तऱ्हा वाघूरकाठच्या माणसांकडे होत्या. जो तो आपापल्या परीने मासेमारी करायचा. सामूहिक मासेमारीचा मला आवडणारा एक रोचक प्रकार सवानीत चाले. तो म्हणजे 'धार दाबणे'. 

नदीची अख्खी एक धार बांध घालून अडवणे. तिचं पाणी दुसऱ्या धारेत वळवणे. हे प्रचंड वेळखाऊ आणि मेहनतीचं काम. कधी मोहल्ल्यातले लोक, कधी कोळीवाड्यातल्या माणसांची टोळी इथे असे. एका टोळीत साधारणतः आठ ते दहा जण. कोळ्यांच्या टोळीत आत्माराम गोविंदा, प्रकाश नथ्थू, चिंधू चावदस आणि आमचे बाबा या कामातले माहीर माणसं. तर मोहल्ल्यातली अफजल, अजमुद्दीन चाचा, बशीर, काळा इब्राहिम ही शातीर. इथल्या तीन प्रवाहांपैकी एक प्रवाह दगड मातीचा बांध घालून मासे पकडणे याला एक अख्खा दिवस लागायचा. टोळीतल्या गड्यांची मानसिक तयारी महत्वाची असायची. ठरलेल्या दिवशी सकाळची न्याहारी आटपून सर्व घरून  टिकम, कुदळ, घेमेल्या, बादल्या, छोट्या तागाऱ्या घेऊन निघत. टोळीतला म्होरक्या गड्यांच्या कुवतीनुसार काम वाटून देई. काठावरची छोटेमोठे दगडं वाहणे आणि चिकन मातीचा गारा तयार करणे हे काम धडाक्यात सुरू होई. टोळीसोबत आलेली चिल्लीपिल्ली बायामाणसंही मदतीला असायची. पिवळ्या मातीचा गारा खुंदळून त्याच्या भेल्या बनबून धारेच्या तोंडाजवळ ठेवला जाई. तोवर उर्वरित वानरसेना रांगेतच साखळी करून दगडं वाहून मोकळे झालेलं असायचे. दोन ते पाच फुट उंच भिंतीचं बांधकाम मग म्होरक्या सुरू करायचा. गारा जितका निब्बर बनेल तितकीच धार फुटण्याची शक्यता कमी. घेसू मिसळलेला गारा, धटांची मुळं धारेला धोकादायक. रेतीतले गोटे, चिलपे धारेत भरण म्हणून लागत. आम्ही लहानगे याच कामावर. धार पूर्णपणे अटकवली की खालचा भाग उघडा पडायचा. मासोळ्या खाली निघून जाऊ नये म्हणून त्यांना हुसकावून लावायची जबाबदारी काही जणांकडे दिलेली असायची. आता डोळ्यांसमोर डबक्यात साचलेलं धारेचं गडुळ पाणी आणि वळवळणाऱ्या मासोळ्या. हे दृश्य पाहून टोळीतले उघडेबंब देह जोमानं कामाला लागत. धार फुटू नये म्हणून नदीमाऊलीला मनोमन विनवत. हे डबके म्हणजे डाब. या डाबा गुडघाभर खोल असत. त्या घेमेल्या-बदल्यांनी उपसले जाई. पाणी जसजसे तळ गाठी तसतसं टोळीला भरतं येई. काहीजण झाडाखालीचे फळं वेचावे तसे मासे, खेकडे, झिंगे हाताने वेचून भांड्यात टाकायचं काम करत. या डाबांमध्येही छोटे छोटे भाग करून उपसा करावा लागे. त्यातही भले मोठे दगड असत ते हलवून त्या खालीचे खेकडे-मासे आम्ही पकडायचो. 

धारेच्या शेवाळांवरून पाय निसटून गडी पडत. मग एकमेकांना हसत खेळत मासेमारी करत. धारेल्या मासोळ्या रुचकर असत. मुऱ्ही, मह्या, झिरमोटी, केंगडा, वावतोडी, सांडकोई, गेर, खार्रच्या, ढोडर, ढेबऱ्या, पिंझाऱ्या, तारू या खास धारेत सापडणाऱ्या मासोळ्या. याशिवाय गांडोग, येडे झेग्रे, लाल मिरची या मासोळ्याही असतात पण त्या खात नाहीत. मिरची ही इवलीशी मासोळी दंश करते. त्याच खूप दाह होतो. पांढरे झिंगे जिंवतच खायचो. एका धारेत बाबाला घेमेलीएव्हढा मोठा खेकडा मिळाला. त्याच्याशी झालेली झटापटी ते अनेकांना सांगत. साधारणपणे या धारेत किमान दहा ते बारा किलो मासे मिळत. दिवस मावळतीला जाईस्तोवर आपापला वाटा घेऊन टोळी घराकडे निघत असे. शेवटी धार फोडणे हे माझं आवडतं काम. एक बारकासा दगड हलवला तरी धार अंगावर येई. क्षणार्धात धार पूर्ववत वाहू लागे. पुन्हा तो खळाळ कानांवर आदडे. धार आणि काठ पुन्हा गजबजून निघे.



Comments