नदी जगलेला माणूस


नदी जगलेला माणूस 

नदी जगलेला माणूस आमच्या घरात होता. आमचे बाबा. रोज संध्याकाळी घरी येताना त्यांची पावलं नदीतून भिजून यायची. अंगात पांढरा पायजमा. मळकट सुळक्यात कळण्याची भाकर ठेचा. खांद्यावर गडायकाठी. तरट लावलेले बाटली. डोक्याला गुंडाळलेली छापी. पायात टायरसोल चप्पल हा बाबांचा नित्य पेहराव. ते लोकांना सांगायचे श्रीकृष्णाने यमुनेच्या काठी गुरं राखली. त्याची परंपरा आम्ही चालवतो आहे. बाबांचे जन्मनाव माधव. हेही कृष्णाचेच नाव. पण माधव  हे नाव केवळ त्यांच्या आणि आमच्या शाळेच्या दाखल्यावर तेवढे होते. आख्य गाव त्यांना ओळखे काळू या नावाने. काळू हे कोळीचा अपभ्रंश असावं. किंवा त्यांच्या रंगामुळे ते काळू झाले असावेत. त्यांचे डोळे तपकिरी पाणीदार होते. नदीसारखे. त्यांची कधीच कुणाला भीती वाटत वाटली नाही. गावातले सानथोर त्यांना ओळखायचे. त्यांच्याशी कोणाचेही वैर नव्हतं. नदीसारखंच त्याचं मनही  निर्मळ होतं. त्यांचं अर्धाधिक आयुष्य सालदारकीत गेलं. उरलेलं आयुष्य नदीकाठी. गुरांमागे. त्यांना नदीची भाषा कळायची. नदीचं पुस्तक त्यांना तोंडीपाठ होतं. नदीची गती, नाद, लय, खोली अशा बारीकसारीक नोंदी त्यांच्याकडे असत. उगमापासून संगमापर्यंतची वाघूर परिक्रमा त्यांनी केलेली होती. झीरपटपासून मेयाच्या डोहापर्यंत ते गव्हारं घेऊन जात. वाघनये, पाचोटी, भाटी, पाभे या नदीकाठच्या रानात त्यांचा हिवाळा निघायचा. पुराच्या गाळात उगवलेलं कोवळं  लुसलुशीत गवत खाऊन ढोरं टम्म फुगायची. उन्हाळ्यात कायभुईच्या रानात उलंगती झालेली असायची. मग सारे ढोरकी आपापलं गव्हारं सकाळी नदीवरून पाणी दाखवून कायभुईत जायचे. उन्हं उतरू लागलीत की एक एक करत पुन्हा नदीवर जमायचे. सातपायऱ्यांजवळ सगळे ढोलकी जमायचे. सुकाबुवा, विठाबुवा, शांताभावजाय आणि बाबांचा घरोबा होता. हे चारही ढोरकी दिवाळीला दिवटी काढायचे. त्यांची तयारी नदीवर चालायची. दिवटीसाठी लागणारी सामग्री एकमेकांना वाटून घेत. चौथ्या आणि पाचव्या दिवसाची दिवटी मोठी असायची. नागांच्या फणा बनवायला लागणारी लव्हाळी आणि सोट नदीतच मिळे. हे काम बाबा मोठ्या आनंदाने करत. एरवीही कधी आंबाडीचा दोर, कधी कुऱ्हाड-फावडा-कुदडीसाठी दांड बनण्यात ते व्यस्त असत. म्हशी नदीत शांत बसलेल्या तर काठच्या पाषाणावर गायी वासरे रवंथ करत पहूडलेली असायची. मासे आणि खेकडे पकडून तिथेच भाजून खायचे. या जुन्या दगडी सातपायऱ्यांनी गावातल्या गुरख्यांच्या कितीतरी पिढ्या पाहिल्या. वरच्या डोंगराची सावली नदीच्या पात्रात पडली की ढोरं घराच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज होत. बाबा जवळच्या आसराच्या झिऱ्याजवळ जावून ओंजळीओंजळीने पोटभर पाणी पीत. नदीतल्या वाहत्या धारेचं पाणी तोंडावर घेत. नदीला नमस्कार करत. मग पाण्यात बसलेल्या म्हशींना घे घे असा आवाज देत उठवायचे. हा इलाज संपला की मग ते हातात खडे उचलून त्यांच्या शिंगावर भिरकवत. बाबाचा निशाणा कधी चुकायचं नाही. शिंगावर दगडाचा आपटण्याचा आवाज झाला की म्हशी पटापट बाहेर येत. ढोरांच्या खुरांनी उठलेले धुळीचे असंख्य लोट नदीचा परिसर झाकून टाकतात. दिवेलागणीला मालकाच्या वाड्यापर्यंत ढोर पोहोचून बाबा घरी यायचे.

जेवणं आटोपले की आम्ही भावंडं बाबांना गोष्टी सांगा म्हणून तगादा लावायचो. त्यांच्याकडे गोष्टींचा हंडा होता. त्या हंड्यात छोट्या-मोठ्या थैल्यांमध्ये गोष्टी बांधलेल्या होत्या. काही गोष्टी मूठभर तर काही गोष्टी दोन-दोन दिवस चालायच्या. या गोष्टी नदीसारख्या झरझर वाहत राहतच असाव्या असे वाटे. रानातल्या, नदीकाठच्या त्यांच्यासोबत घडलेल्या हकीकती सांगताना बाबा पुन्हा नदीकाठ भटकून यायचे. ‘एका तपस्वी साधूने गावकऱ्यांना दिलेला शाप’ ही गोष्ट ते बऱ्याचदा सांगायचे. ही गोष्ट सांगून झाली की आम्ही भीतीने शांत होवून जायचो. बाबाही अस्वस्थ होत असत.

बाबा जेढारबुवाला मानायचे. कोणी भूता-खेताला घाबरलं किंवा वाईट स्वप्न पडत असेल किंवा आपल्या मागची बलाय जावी लोकं या जलदेवतेला पुजत. कुणाला विंचू-गोम-सापाने चावा घेतला बाबा त्याचं विष मंत्रवून काढत. धामण चावली तर तोंडात लव्हाळी चावत सात वेळा नदी पार केली की विषबाधा होत नाही हा त्यांचा शोध होता. नदीतल्या भोवऱ्यात अडकलेली म्हैस ते एकट्याने काढून आणत. अचानक आलेल्या जीभेत वाहून गेलेल्या अनेकांचे प्राण त्यांनी वाचवलेत. केवढाही पूर आलेला असला तरी बाबा आपले गुरं पाण्यात ढकलून त्यांच्या शेपटी धरून नदी पार करायचे. खुपदा जीवावर बेतणारे प्रसंग त्यांनी अनुभवले. नदीनं त्यांचा कधी घात केला नाही. 

 नदी आटली आणि हळूहळू गावाला घरघर लागली चराई संपली. गुरंढोरं दुसऱ्या गावांना पोहोचवली. काहींनी विकली. काहींनी थेट कसायाला दिली. गावकऱ्यांच्या गुराढोरांना लेकरासारखी माया करणाऱ्या बाबांसारख्या गुराख्यांना हे चित्र पहावत नव्हतं. अधून-मधून एकमेकांच्या घरी जाऊन आपला समृद्ध भूतकाळ ते पुन्हा पुन्हा उकरून काढत. हाच त्यांचा विरंगुळा होता. गुडघेदुखीने बेजार झाल्यामुळे बाबांनी गव्हारं सोडून दिलं. काही दिवस एका हलवायाच्या दावणीतल्या म्हशी त्यांनी चारल्या. घरच्या गायींचे खुंटेही ओस पडलेले. तरी ते स्वस्थ बसायचे नाही. हातात विळा घेऊन ते नदीच्या वाटेनं निघत. कुठे मासे मिळतात का पाहत. पाणथळ जागी वकीर पाहून खेकडे पकडण्याचा विफल प्रयत्न करत राहायचे. संध्याकाळी बाबा गवताच्या पेंढ्या घेऊन घरी परतायचे. लोकांना त्यांची ही कृती सवयीची झाली होती. कुणी त्यांना टोकायचे नाही कधीच. इतके वर्षे गुरा-ढोरांशी लळा लागलेल्या बाबांना आता आपल्याकडे एकही ढोर शिल्लक नाही याचं भान त्यांना राहत नव्हतं. आयुष्यभर नदीच्या ओटी-पोटी-काठी राहून नदी जगलेल्या बाबांना आपली नदीच मृत पावली आहे हे ढळढळीत सत्य असलं तरी पटायचं नाही. दर अमावस्येला भल्या पहाटे ते नागझिरीतलं पाणी आणायला जात. हे पवित्र पाणी अंगावर टाकले की गुरांवरील इळापीडा जाते म्हणून ते हे काम आजवर नित्यनेमाने करत आले होते. आता मात्र गोठा सुना आणि नदीवरून येणारा हंडाही रिकामा असे. हे दृश्य फार जीवघेणं. त्याहून जीवघेणं होता बाबांचा शेवटचा काळ. त्यांच्या मेंदूचं नियंत्रण सुटलं होतं. उण्या रक्तदाबामुळे कोणत्याही औषधांचा त्यांच्यावर असर होईना. काहीच खात नव्हते की पीत नव्हते. खाटेवर पडून असत. कुणाची काहीच बोलायची सूद हरपली होती. बायको लेकरं नातवंडांची ओळख लागेना. कधी गुरांना हाकलतानाचा आवाज काढत. अखंड असंबंध बोलत. कधी गोष्टी सांगत. रानातल्या नदीवरच्या गोष्टी. कधी आपल्या ढोरकी सोबत्यांशी केलेल्या गप्पा असत. नदीचा पुर त्यांच्या चेहऱ्यावर ओसांळून वहायचा. त्याची छबी अधूनमधून झळकायची. पुराबद्दल कीतीतरी गोष्टी ते बोलून जात. मोठ्याने हसायचे. घडीत रडायचे. आम्ही भावंडं पुन्हा लहान झालो होतो. पुन्हा बाबांच्या भोवती गराडा घालून गोष्टी ऐकत होतो. कुठलाही तगादा न लावता. बाबांनी श्वास सोडला तेंव्हा त्यांच्याजवळ कुणीही नव्हतं. त्यांचे शेवटचे ते काय बोलले हे कुणाला माहीत नाही. देव तर त्यांना माहीत नव्हता. नक्कीच ते वाघूरविषयी बोलले असतील.




Comments